Sunday, 15 February 2015

गोवळकोट

कोकण भागात वाशिष्टी नदीच्या तीरावर चिपळूण शहर वसले आहे . याच चिपळूण मध्ये #गोवळकोट किल्ला आहे . हा किल्ला एका बेटावर आहे . बेटाच्या सगळ्या बाजूने वशिष्टी नदी वाहते . परंतु इतर जलदुर्गांप्रमाणे संपूर्ण बेट किल्ल्यात घडवले नसून बेटाच्या एका कोपऱ्यातील टेकडावर किल्ला बांधला आहे त्यामुळे शक्यतो जलदुर्ग प्रकारात या किल्ल्याचा समावेश होत नाही .

किल्ल्याला जास्त चढण नसल्यामुळे गिरिदुर्ग म्हणण्यापेक्षा भुईदुर्ग म्हणणे जास्त श्रेयीस्कर आहे . गोवळकोट किल्ल्याचे इतिहासात जास्त उल्लेख नसला तरी एखादे टेहळणी केंद्र , दारुगोळा साठवण्याचे ठिकाण किंवा इतर सबब गोष्टींसाठी किल्ल्याचा वापर होत असावा .

सध्या किल्ल्यावर ७ बुरुज , काही तोफा(प्रवेशद्वाराच्या बाजूच्या बुरुजावरच आहेत ) , दारूगोळा व धान्य कोठाराचे अवशेष इत्यादी आहेत . एक हौद सदृश पुष्करणी असली तरी त्यात पर्जन्य व्यतिरिक्त पाणीसाठा नसतो .
किल्ल्यावर एक रेडजाई देवीचे मंदिर आहे जे पूर्णत नष्ट झाले आहे सध्या तेथे स्थानिक लोकांकडून छोटेखानी मंदिर व पत्र्याची पडवी बांधण्यात आली आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी सोमेश्वराचे मंदिर आहे. किल्ल्याची तटबंदी तशी शाबूत असली तरी प्रवेशद्वार , बुरुजाच्या भिंती पूर्णपणे कोसळल्या आहेत . _किल्ल्यावरील काही तोफांचा वापर नदीकिनारी बांधलेल्या जेटीखाली पुरण्यासाठी केला आहे_ . शिमग्याच्या वेळी किल्ल्यावरील मंदिरात पालखी आणण्यात येते इतरवेळी मात्र किल्ला ओसाड असतो. किल्ल्याच्या सर्व बाजूनी उतारावर लोकांची वस्ती आहे . या वस्तीमध्ये किल्ला हरवल्यासारखा भासतो फक्त माथ्यावर वस्ती नाही परंतु इतक्या लोकवस्तीमध्ये असूनसुद्धा किल्ल्याची हवी तशी निगराणी होत नाही किल्ल्याची बरीचशी पडझड झाली आहे पण किल्ल्यावरून दिसणारे वाशिष्टीचे नयनरम्य दृश्य आणि चिपळूणचा देखावा , मुंबई-गोवा मार्ग आणि सौम्य वारा या सगळ्यासाठी तरी किल्ल्यावर अवश्य जावे .

Shivrajya Pratishthan

No comments:

Post a Comment