Friday, 27 February 2015

“मावळा” काल आणि आज...
१९ फेब्रुवारी १६३०,नाही.. १६२७ कदाचित पण मला वाटत १६३० ठीक. हा प्रश्न मलाच नाही तर समस्त शिवप्रेमी मावळ्यांना पडला आहे कि महाराजांचा जन्म कधी झाला.आणि त्यांचा जन्म दिवस तिथी नुसार साजरा करायचा कि तारखे नुसार...??? असो..
“१९ फेब्रु.१६३०” साली महाराष्ट्राच्या भूमीवर देव देश धर्म रक्षणार्थ साक्षात महादेवाने शिवरायांच्या रुपात जन्म घेतला आणि बघता बघता आईसाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाने शिवरायांनी स्वतःच्या मनगटाच्या बळावर श्रींच हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य स्थापन केलं.
६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते संपन्न झाला आणि रयतेचं स्वराज्य स्थापन झालं.राजसिंहासना कडे महाराजांची पाऊले चालत असतांना पहिल्या पायरीवर महाराजांचे चरण स्पर्श होताच महाराजांच्या कानावर आवाज आला राजं... महाराजांनी आवाजाच्या दिशेला नजर टाकली तर त्यांना दिसला तो मावळा तानाजी मालुसरे त्यांना आठवण झाली ती “राजं आईसाहेबांचं स्वप्न हाय नवं कोंढाणा स्वराज्यात आणायचा असं मग आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाचं” स्वतःच्या पोटच्या पोराचं लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी कोंढाणा काबीज करायला गेलेला तानाजी परत आलाचं नाही.गड आला पण सिंह मात्र गेला. महाराजांनी दुसरी पायरी चढली आणि तितक्यात त्यांच्या चरणाला स्पर्श केला तो न्हाव्याच पोरग मावळा शिवा काशीदनं तो म्हणाला महाराज तुमची कापड अंगावर घातली आणि हा देह पवित्र झाला. भाला छातीत आरपार घुसला व्हता बघा, पण तरीबी आम्ही झुकलो नाय कारण डोक्यावर जिरेटोप होता नं राजं.शिवाजी महाराज म्हणून मरण आलं धन्य झालो आम्ही आमच्या जिवनाच सार्थक झालं.शिवा काशीद सारखा मावळा महाराजांना भेटला आणि त्याने शिवरायांचे रूप धारण करून मोघलांच्या छावणीत घुसून महाराजांच्या छातीवरील घाव स्वतःच्या छातीवर झेलून जिवनाचं सार्थक केलं
महाराज सिंहासनाच्या जवळ आल्या नंतर महाराजांच्या समोर उभे ठाकले ते म्हणजे मावळा बाजीप्रभू देशपांडे आणि महाराजांना म्हणाले महाराज एका वडीलकीच्या नात्यानं संगतोया कि मुकाट्यान तुम्ही पालखीत बसून विशालगड गाठा तो पर्यंत मी या खिंडीत या मोघलांना अडवून धरतो जो पर्यंत या देहात प्राण आहे तोवर एकबी गनिमाला खिंडीतून पुढे जाऊ देणार नाही.लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगलाचं पाहिजे.आजही हे शब्द त्या खिंडीत गुंजत आहे.इतकाच नाही तर त्या मावळ्यांच्या रक्तान ती खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. असे अनेक मावळे स्वराज्याच्या कामी आले कित्येक मावळ्यांनी स्वतःच आयुष्य स्वराज्याच्या निर्माणासाठी खरची घातलं, मावळ्यांनी शिवरायांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि स्वराज्याच रक्षण केलं.स्वराज्य उभ केलं स्थापन केलं.
म्हणून आज ४०० वर्षांचा काळ लोटला गेला असतांना सुद्धा त्यांची नाव अभिमानाने घेतली जातात.त्यांच्यावर काव्य आणि पोवाडे रचले जातात.त्यांच्या शौर्याची गाथा सुवर्ण अक्षरात लिहिली जाते.कारण ते स्वामिनिष्ठ स्वभिमानी कडवट मावळे होते. स्वामिभक्ती,स्वामीनिष्ठा आणि स्वाभिमान यांचा अद्-भूत संगम म्हणजे “मावळा” हि व्याख्या लक्षात ठेवा. इतकच नाही तर महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी राष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या निर्माणासाठी सह्याद्रीसारखं ठाम पणे उभं राहून शत्रूंच्या तलवारीचे घाव आपल्या छातीवर झेलणारे ते म्हणजे मावळेचं हो.या मावळ्यांच्या फौजे मध्ये कोणी एका जाती किंवा धर्माचा नव्हता तर १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार यांचा समावेश होता.परंतु आता सर्व काही बदललेलं आहे.
एक काळ असा होता कि त्या काळात एका भगव्या झेंड्या खाली सर्व एकजूट होते परंतु आता तर कोणता झेंडा घेऊ हाती ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.कारण आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झालेत.प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार स्वतःचे संघटन उभारले आहे. त्यामुळेचं आजच्या युवा पिढीला देशसेवा आणि राष्ट्रसेवा करण्यात रस राहिलेला नाही.देशात आज अस एकही नेतृत्व नाही कि ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याच्याशी एकनिष्ठ राहून देशाची प्रगती साधता येईल.असे असतांना ४०० वर्षपूर्वी याच मातीत जन्माला आलेल्या शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काही मोजकी मंडळी देशाची प्रगती आणि देव देश धर्म रक्षणाची कार्य करत आहेत.ज्याला ते शिवकार्य असं संबोधतात.
आजच्या परिस्थितीचा जर अभ्यास केला ना तर आज फक्त भाषणबाजी सुरु आहे.
जो नाही तो फक्त बोंबलत हिंडत आहे.’’अस करा..तस करा..यांनी अस केल होत..ते असे जगले..आणि स्वतः मात्र काहीच नाही.आजच्या काळात अहो असे वक्ते आहेत कि ज्यांची भाषणे ऐकतांना लोक भावूक होतात,सर्व भान विसरून तल्लीनपणे ते ऐकतात इतकंच नाही तर त्यांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत.अंगावर शहारे उभे राहतात.परंतु ज्या वेळेस कार्यक्रम संपला एकदा काय त्या श्रोत्यांनी त्यांची चड्डी झटकली कि बस..संपलं भाषण उठा आणि निघा.“गाढवा पुढे वाचली कथा आणि कालचा गोंधळ बराच होता” अशी म्हण तेव्हा तिथे लागू पडते.शिवरायांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज फक्त नजरेने त्यांच्या मावळ्यांशी संवाद साधत होते.आणि मावळे सुद्धा तसे निष्ठेचे होते त्यांना आपल्या राजाला काय हव आहे ते लगेच कळत होत.तिथे शब्दांची गरजचं नव्हती कारण तिथे तो संवाद एका गुरुशिष्यांचा असायचा.देव आणि भक्ताचा असायचा.आता मात्र तस काहीच नाही.
एकदा शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असतांना तिथून सुटका करून घेण्यासाठी महाराजांनी एक योजना आखली त्यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या न्हाव्याच्या पोराला बोलावलं आणि त्याला शिवाजी महाराजांचे रूप धारण करायला सांगितले त्याने आज्ञाप्रमाण म्हणून ताबडतोब राजांसारखा पोशाख परिधान करून समोर आला आणि महाराजांना मुजरा केला.महाराजांनी त्याला बघितलं आणि थक्क झाले कारण तो चक्क शिवाजी महाराजांसारखा दिसत होता.त्याच नाव होत मावळा शिवा काशीद.महाराज त्याला बोलले शिवा तू हुबेहूब आमच्या सारखा दिसतोस ओळखूपण येत नाही आणि इतक्यात तो शिवा काशीद म्हणाला महाराज ज्या अर्थी तुम्ही सुद्धा आम्हाला ओळखू शकत नाही याचा अर्थ तो गनीम सुद्धा आम्हाला ओळखणार नाही.आणि हे शब्द ऐकताच महाराज त्याला म्हणाले शिवा तुला कस माहिती कि आम्ही तुला शिवाजी महाराज बनवून गनिमांच्या भेटीस पाठवणार आहे. तेव्हा शिवा म्हणाला महाराज तुमची जागा आमच्या हृदयात आहे आणि जे तुमच्या मनात आहे ते आम्हास कळणार नाही.आम्हास सर्व कळल आहे आपली फक्त आज्ञा असावी तुम्ही निश्चिंतपणे गड सोडा तो पर्यंत आम्ही गनिमांना अडवून धरतो.अहो हाच तो संवाद गुरुशिष्यांचा. परंतु आता मात्र हा संवाद आपल्याला बघायला मिळत नाही. कारण आताचा गुरु सुद्धा तितका पावरफुल नाही आणि शिष्य सुद्धा तितका निष्ठेचा नाही.
मी सारख सारख शिवाजी महाराजांचा उल्लेख का करत आहे असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर तुम्हाला एक सांगावस वाटत कि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक व्यक्तिमत्व जन्माला आलं कि ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव,दारात तुळस आणि समाजात स्त्री जातीला मान आहे.जन्माला आलेल्या नवजात शिशूला हे सांगाव लागत नाही आणि त्याच्यासमोर मांडाव सुद्धा लागत नाही कि शिवाजी महाराज कोण होते इथली मातीच त्याच्या हृदयात शिवरायांच्या कीर्तीची शौर्यगाथा आधीच रेखाटून ठेवते.इतक मोठ कार्य कि जे मांडायचं झाल तर सागरा इतकी शाई आणि गगना इतक पान सुद्धा कमी पडेल.आणि असा कर्तव्यदक्ष जाणता राजा या भूतलावर पुन्हा झाला नाही आणि होणार सुद्धा नाही.म्हणून अश्या परमप्रतापी भोसले कुलाधीकुलभूषनंचा उल्लेख कितीदा जरी केला तरी कमीचं.
आणि असही आजच्या पिढीला वेड लागलं आहे हो शिवबाचं ! गाडीवर,टी-शर्टवर, अंगावर(गोंधन), गळ्यात(लॉकेट), हातात(अंगठी) शिवाजी महाराजांना घेवून फिरतांना दिसत आहे.त्यांच्या अश्या वागण्यामुळे त्यांना महाराजांबद्दल किती आदर,प्रेम आणि अभिमान आहे हे दिसून येते मात्र त्यांची कर्म जर बघितली तर मला या सर्व गोष्टींची लाज वाटते आणि राग सुद्धा येतो त्यांच्या अश्या वागण्याचा.
एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तिथे ४ मावळे सोबत घेवून राजे शिवाजी महाराज सुद्धा होते म्हणजे यांच्या वेशभूषा साकारलेली मुल सुद्धा होती. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक सुरु झाली.मिरवणूक सुरु असतांना एका मावळ्याने म्हणजे मावळ्याची वेशभूषा साकारलेल्या त्या मुलाने एका दुसऱ्या मुलाला गुटखा दे अशी मागणी केली. तेव्हा त्याच्या सोबतच्या दुसऱ्या मावळ्याने त्याला जाणीव करून दिली अरे तू मावळा आहे ना आणि तंबाखू काय खातो महाराज बघतील ना मागून.तेव्हा ज्याने त्याला गुटखा आणून दिला तो खालचा मुलगा लगेच बोलला अरे महाराज कशाला काही करतील मी महाराजा कडूनच तर गुटखा मागून आणला.ते सर्व बघून डोळ्यात पाणी दाटलं हो, “श्रोत्यांनो हि आजची सत्य परिस्थिती आहे. अहो ज्यांनी स्वतः शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा वेश धारण केला त्यांना त्यांची महती कळली नाही तर मग मला सांगा अंगावर आणि गाडीवर तसेच शर्ट वर शिवाजी महाराजांचे चित्र किंवा नाव टाकून आपल्याला शिवराय कळणार आहे का ? शिवाजी महाराज डोक्यावर घेवून फिरण्याचा विषय नाही तर डोक्यात उतरवण्याचा विषय आहे हे कळायला हवं.रस्त्याने जात असतांना जर नजरेस महाराजांचे स्मारक दिसले तर आपल मस्तक आपोआप झुकत आणि ते झुकायलाचं हव परंतु आज त्याच स्मारकाच्या खाली उभ राहून मुलींची छेड काढली जाते.यांच्या गाडीवर मागे लिहिलेलं असत आम्ही फक्त शिवरायांचे भक्त तरी मग तुम्ही नेत्यांच्या समोर झुकताच तरी कसे.शिवरायांचा भक्त स्त्रीजातीचा आदर करतो तिचे रक्षण करतो,अन्याय सहन करत नाही, तो न्यायप्रिय असतो. तसेच शिवरायांचा भक्त म्हणजे मावळे यांनी शिवाजी महाराज सोडले तर कधीच कोणत्या राजा पुढे किंवा बादशहा पुढे ते झुकले नाही आणि त्यांनी कधी पाठीवर कुणाची शाब्बासकीची थाप तर मुळीच घेतली नाही.इथे मात्र महाराजांचे नाव घेवून दीडदमडी साठी आणि पदासाठी पक्षांतर सहज केले जाते.काय हेच का तुम्ही मावळे, आहो तुम्ही कावळे आहात कावळे.
महाराज्यांना एकदा गोवळकोंड्याचा बादशहा कुतुबशहा कडील आमंत्रण आले आणि महाराज त्यांच्या भेटीला गेले तिथे कुतुबशहा ने महाराजांना महाल
दाखवला,सोने-चांदीचा खजाना दाखवला शस्त्रशाळा,घोडेशाळा दाखवली आणि मातंग, बलाढ्य,बळकट,लढाऊ अशी हत्तींचीशाळा दाखवली आणि महाराजांना म्हणाले महाराज तुमच्या कडे सुद्धा असेल ना असे हत्ती तेव्हा महाराज बोलले आमच्या कडे हत्ती नाही पण या हत्तीसारखी माणस मात्र आहे.
तेव्हा त्या कुतुबशहा ने सांगितलं कि ठीक आहे मग तुमच्या कडील हत्तीसारख्या माणसाची आमच्या या हत्तीशी लढाई होऊ द्या.आणि महाराजांनी यसाजी कंक याला आज्ञा केली आणी लगेच यासाजी मुजरा करून हत्तीच्या समोर गेला आणि त्याने एका क्षणात हत्तीला गारद केला कुतुबशहा बघतच राहिला आणि त्याने त्याच्या गळ्यातील सोन्याची माळ बक्षीस म्हणून यासाजी ला दिली आणि तितक्यात यसाजी मागे सरकला आणि बोलला कि आमचे कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहे आम्हाला आमच्या पाठीवर कुणाच्या शाब्बासकीची थाप सुद्धा नको. निष्ठा म्हणजे ती हिच.आणि मावळ्यांची शिवरायांबद्दलची स्वामिनिष्ठता म्हणजे हिच आहे.आणि अश्या स्वमिभाक्तांना आम्ही अभिमानाने मावळे म्हणतो.
आजच्या युवा पिढीला इतकच सांगू इच्छितो कि, गड्कील्ल्यांवरती उभे राहून फोटो काढण्यापेक्षा गड्कील्ल्यांसारख ताठ आणि स्वाभिमान धरून उभे रहा तेव्हा शिवरायांच स्वराज्य टिकेल आणि तेव्हा तुम्ही खरे मावळे आहात याची पावती मिळेल.आज अनेक काही संघटना शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दुर्गसंवर्धन तसेच निस्वार्थ समाजसेवा करतांना दिसत आहे.गडकिल्ले स्वच्छता मोहीम सुद्धा राबवतांना ते दिसत आहे.तर अश्या या संघटनांना पाठींबा देवून त्यांच्या सोबत मिळून स्वराज्याचे गडकोट संवर्धन करण्याच कार्य हाती घ्या आणि ज्या गडकिल्ल्यांनी ४०० वर्षापूर्वी आपले रक्षण केले आज तुम्ही त्यांचे रक्षण करा कारण गडकिल्ले टिकले तर इतिहास टिकेल आणि इतिहास टिकला तरचं राष्ट्र टिकेल आणि जो कोणी हे कार्य करण्यास धन्यता मानत असेल तर तोच खरा मावळा आहे अस मी मानतो.कारण गडकिल्ल्यांची खरी किंमत हि एका खऱ्या मावळ्यालाचं असते.
--------------
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
अंधाराला घाबरत नाय आभाळाची साथ हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी
करत नसतो कधी आम्ही किती कुणाची जहागीरदारी
भगव्या समोर स्वराज्यातच गड्कील्ल्यांचा घात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
गड्कील्ल्यांसाठी भांडतो आम्ही मदतीसाठी लढतोय
स्वराज्यात शिवरायांचा रायगड आज रडतोय
हे नुसतेच तांडव नाही आमचे अन्यायावर मात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
पुरे झाले तुमचे आता आश्वासनाचे हल्ले
बुरुजासकट जागे करू स्वराज्यातील किल्ले
पाठीवर अजून आमच्या शूर शिवाचा हात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
स्मरण ठेवा तानाजीचं मरण आठवा संभाजीचं
स्वराज्यासाठी रक्त सांडल पावनखिंडीत बाजीच
त्यांनी पाठीमागून वार केले हाच मोठा घात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
-----------------------------------------------------------------------------------
- सागर महाडिक (शाब्दिक वादळ)
जगदंब

No comments:

Post a Comment